नवी दिल्ली | प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत, बंडखोरीनंतर मूळ पक्षावर दावा सांगणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांविरोधात असल्याचे न्यायालयासमोर मांडले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी 2013 पासून उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अधिकृत पक्षप्रमुख असल्याचे सांगितले. तसेच 2018 मधील पक्षांतर्गत निवडणुका आणि पक्षघटना विचारात न घेता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देणे योग्य नसल्याचा दावा केला. त्यांनी 'सुभाष देसाई' प्रकरणाचाही दाखला देत विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट केला.
ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत शिंदे गटाला देण्यात आलेल्या धनुष्यबाण चिन्हाचा वापर केवळ तात्पुरता असल्याचे स्पष्ट करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.
दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका घटनात्मकदृष्ट्या भक्कम असल्याचा दावा करत, अंतिम निर्णय आपल्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणताही अंतिम निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सुरू असून पुढील सुनावणीनंतरच या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Tags:
शिवसेना