जाफराबाद | प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र समोर आले असून, यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दैनंदिन प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांपासून या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, डावरगाव देवी येथील होतकरू तरुण पवन नारायण नवले यांनी गावातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि साचलेल्या पाण्याचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांनी गावातील विविध ठिकाणांचे चित्रीकरण करून #ग्रामपंचायत_डावरगाव_देवी या हॅशटॅगसह व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये गावातील रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचलेली ठिकाणे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या स्पष्टपणे दाखविण्यात आल्या आहेत.
पवन नवले यांनी गावाच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक नागरिकांनी त्याला पाठिंबा दर्शवत ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांची दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा आणि आवश्यक विकासकामे तातडीने करण्यात यावीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साचणारे पाणी हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणी ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरल्यानंतर संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
---
