कर्जमाफीच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना; आधार प्रमाणीकरण आणि KYC तातडीने पूर्ण करा.

प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स

राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत पहिल्या टप्प्यात नाव आलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) आणि KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सूचनेनुसार, ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या पहिल्या यादीत आहेत त्यांनी जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. शासनाकडून कर्जमाफीची रक्कम बँकेच्या NPA (Non-Performing Asset) डेटानुसार जमा केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यादीतील काही लाभार्थ्यांच्या खात्यात अपेक्षेपेक्षा कमी रक्कम जमा झाल्यास घाबरून न जाता प्रथम आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची उर्वरित रक्कम बँकेमार्फत नियमानुसार समायोजित केली जाईल, त्यामुळे बँकेत अनावश्यक गर्दी करू नये, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांनीही आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँक खात्याचे KYC केलेले नाही, त्यांनी तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो.

महत्त्वाची सूचना: लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासन व संबंधित बँकेकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
Previous Post Next Post