३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

मुंबई | प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स

राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील काही दिवस अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर इतर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, जळगाव, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून नदी-नाले आणि धरणांतील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त किंवा धोकादायक भागांपासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाडा टाइम्स Marathwada Times 

Post a Comment

Previous Post Next Post