Maharashtra Rain Update ऑगस्टमध्ये पावसाची कशी राहणार स्थिती? हवामान विभागाचा अंदाज; विदर्भ- मराठवाड्यासाठी दिलासादायक संकेत

मुंबई | प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असली, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलै अखेरपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला असला तरी १ जूनपासूनच्या हंगामात दोन्ही विभागांमध्ये सरासरी पावसाची नोंद अद्याप पूर्ण झालेली नाही. विदर्भात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्के, तर मराठवाड्यात ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. याउलट मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १२५ टक्के, तर कोकणात १०१ टक्के पाऊस झाला आहे.

३१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार विदर्भात सरासरी ४८४.७ मिमी पावसाऐवजी ४६२.८ मिमी, तर मराठवाड्यात ३०५.१ मिमीच्या तुलनेत २८१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढून ही तूट भरून निघते का, याकडे शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांत मुसळधार पावसामुळे नद्या व धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post