अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि मंत्री संजय सावकारे यांना युवा लेखक पुरुषोत्तम रेडे यांची पुस्तकभेट

मुंबई / अंबड | मराठवाडा टाइम्स वृत्तसेवा

अंबड येथील युवा लेखक तथा सॉफ्टवेअर इंजिनिअर पुरुषोत्तम नामदेव रेडे यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि राज्याचे मंत्री संजय सावकारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेले ‘तुमच्या श्रद्धेवर मला प्रश्न आहेत’ हे वैचारिक पुस्तक दोन्ही मान्यवरांना सप्रेम भेट दिले.

या पुस्तकातून श्रद्धा, अंधश्रद्धा, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या विषयांवर विचार मांडण्यात आले आहेत. तथागत गौतम बुद्ध आणि अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ घेत, परंपरा आणि श्रद्धांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची भूमिका या लेखनातून मांडल्याचे सांगण्यात आले.

‘प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढावी’

समाजात स्वतंत्र विचार, तर्कशुद्ध दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्ये रुजावीत, हा पुस्तकामागील उद्देश असल्याचे पुरुषोत्तम रेडे यांनी सांगितले. श्रद्धेचा स्वीकार करतानाही प्रत्येक गोष्टीचा विवेकाच्या आधारे विचार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

या सदिच्छा भेटीदरम्यान अजय खरात, आदित्य पुंड आणि युवराज शेळके उपस्थित होते.

ग्रामीण भागातून पुढे येत सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम रेडे यांनी वैचारिक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना स्पर्श केला आहे. त्यांच्या पुस्तकातून श्रद्धा, विवेक आणि स्वतंत्र विचार यांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मराठवाडा टाइम्स | Marathwada Times
www.marathwadatimes.com



Post a Comment

Previous Post Next Post