देशातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. दयानंद (ज्ञानदेव यशवंतराव) डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत देशभरात शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था, विद्यापीठे आणि रुग्णालयांचे विस्तृत जाळे उभारले. त्यांच्या संस्थांमधून लाखो विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले असून, शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर त्रिपुराचे राज्यपाल, बिहारचे राज्यपाल आणि पश्चिम बंगालचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना देशभरात मोठा सन्मान मिळाला.
डॉ. पाटील यांच्या निधनानंतर राज्यभरातून राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी, शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची त्यांची दूरदृष्टी आणि संस्थाबांधणीतील योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.