मुंबई | प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत, "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, मात्र भाषेच्या नावाखाली कोणताही हिंसाचार किंवा दडपशाही खपवून घेतली जाणार नाही," असे ठामपणे सांगितले.
महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. राज्य सरकारने मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मराठी शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रिक्षा संघटनांच्या मागणीनंतर या नियमाच्या अंमलबजावणीसाठी मुदत ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्र हा कधीच संकुचित विचारांचा प्रदेश नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे."
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावी, यासाठी सरकार आवश्यक ते सहकार्य करेल. मात्र भाषा शिकवण्यासाठी मारहाण, धमक्या किंवा हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे योग्य नसून सरकार अशा प्रकारांना कदापि समर्थन देणार नाही.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील नागरिक, मराठी बांधव आणि कामगारांना शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही नमूद केले.
Tags:
महाराष्ट्र