अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांतून समाजपरिवर्तनाची प्रेरणा : शिवशाहीर अरविंद घोगरे

जालना l प्रतिनिधी

घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रमुख वक्ते शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील वाटा अधोरेखित केला. "अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात उभी राहणारी लेखणीच समाजात परिवर्तन घडवते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा आहे," असे ते म्हणाले.

यावेळी व्याख्याते भगवानराव तौर यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी गणेश जाधव आणि अजय सवणे यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संदीपसिंह गौर होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. राधेश्याम राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मनोज गवळी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनील सामत्रे यांनी मानले.

यावेळी प्रा. डॉ. सर्जेराव ताठे, प्रा. दीपक मस्के, प्रा. योगेश पल्लेवाड, प्रा. जयश्री गोफणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— मराठवाडा टाइम्स Marathwada Times 

Post a Comment

Previous Post Next Post